Home कथा आत्महत्या की खून?

आत्महत्या की खून?

by Patiljee
571 views
खून

त्याचा मृतदेह पाहून फारसं कोणाला दुःख झालं नाही, चेहऱ्यावर कितीही दुःख दाखवत असले तरीही जवळ- जवळ सगळ्यांनीच सुटकेचा श्वास सोडला होता.

तो माणूस म्हणून जितका नालायक होता, तितकाच तो प्रत्येक नात्यामध्ये असफल होता. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती तर त्याला कंटाळलीच होती मात्र संपूर्ण गावदेखिल रोजच्या गोंधळाने त्रासले होते.

रोज दारू पिऊन येणे बायकोला, मुलांना, आईला मारणे, गावात गोंधळ घालने, रोज कोणाशी तरी भांडून त्रास देणे अक्षरशः सगळे वैतागले होते. पण म्हणून त्याचा मृत्यू व्हावा असं कोणाच्या मनातदेखील आलेलं नव्हतं, पण त्याचा अपघात झाला की खून हे कळायला काहीच मार्ग नव्हता.

कोण असेल या मागे कोणी केलं असेल आणि का? असे खूप प्रश्न पोलिसांना आणि गावातील लोकांना पडले होते.
पोलिसांनी तशी चौकशीला सुरुवात केली, पण सखाराम तसा काही अगदी मोठा माणूस नव्हता की त्याचे कोणी शत्रू असतील, त्याला त्याची दारू मिळाली की विषय संपला, आणि त्याचे मित्र देखिल त्याच्यासारखेच. पण तरीही पोलिसांनी चौकशी केली दारू पिऊन भांडण करून मारामारी मधे तर हे सगळं झालं नाही ना? याची चौकशी केली, मात्र हाती काहीच लागले नाही.

मग पोलिसांनी गावात चौकशीला सुरुवात केली, तर समोर आलं की सखाराम ची प्रत्येक दुसऱ्या माणसासोबत भांडणं होती, आणि घरातदेखिल तीच अवस्था. त्यामुळे एका कोणा व्यक्तीवर संशय घेणं कठीण होतं. मग पोलिसांनी तपासाची दिशा थोडी बदलून पाहिली.

गावात सखारामच्या मृत्यूअगोदर कोणती घटना घडली होती का? याचा पोलिस तपास करू लागले तर त्यांच्या नजरेत दोन – तीन अशा गोष्टी आल्या, मात्र त्यात संशय येण्यासारखं काहीच नव्हतं असं म्हणता येणार नाही.

पहिला वाद झाला होता तो गोठ्यातल्या जनावरा वरून, कारण क्षुल्लक होतं, मात्र वाद अगदी टोकाला पोहोचला होता. उधारी न मिळाल्यामुळे जनावर नेऊ अशी धमकी दिली होती सखारामला.

दुसरी घटना अशी की सखाराम नेहमीप्रमाणे दारू पिऊन त्याची गाडी चालवत होता आणि अचानक त्याच्या गाडीखाली एक कुत्र्याचं पिल्लू आलं, सखारामला तशीही रोजची शिव्या खायची सवयच झाली होती, त्यामुळे त्याने निर्ल्यज्यसारख्या शिव्या ऐकून घेतल्या आणि तिथून तसाच निघूनही गेला.

तिसरा प्रसंग असा घडला की, सखारामच्या अज्ज्या पंज्ज्याची एकवीस एकर जमीन वादात अडकली होती, आणि ती सोडवण्यासाठी कर्जाचा मोठा डोंगरही चढवला होता आणि त्यावरून सतत समोरच्या पार्टीशी म्हणजेच पाटील यांच्याशी वाद चालू होते, आणि तसाच वाद सखारामच्या मृत्यूअगोदर देखिल झाला होता, अगदी गोष्टी हाणामारी पर्यंत पोहोचल्या होत्या पण धमकी देऊन प्रकरण मिटलं.

तिसऱ्या प्रसंगावर पोलिसांचा जास्त संशय होता, कारण जर सखाराम ने आत्महत्या केली असेल तर, कर्जाचं कारण अगदीच होतं आणि जर हा खून होता तरीही कशावरून याच लोकांनी त्याला मारले नसेल? एकवीस एकर जमीन नक्कीच फायदेशीर व्यवहार होता खुनासाठी.

त्याचा खून झालाय की आत्महत्या ते पोलिसांना postmortem report वरून कळणारच होते, पण पाटीलवर पोलिसांचा दाट संशय होता.

दुसऱ्या दिवशी कळालं की, सखारामचा खून झाला होता. मग पोलिसांनी पटलांना चौकशीसाठी बोलावले, बघता बघता हि बातमी संपूर्ण गावात पोहोचली आणि लोकांनी पाटलांना गुन्हेगार सिद्ध देखिल केलं.

परंतु चौकशीदरम्यान असं लक्षात आलं की, ही घटना जेव्हा घडली तेव्हा पाटील बाहेर गावी गेले होते. कुठुंबसोबत आणि त्यांनी तसे पुरावे देखिल दिले, जसं की टोल नाक्याच्या पावत्या, हॉटेल चे बिल ईत्यादि. या गोष्टी पुरेशा होत्या त्यांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी.

मग पोलिसांनी पहिल्या प्रसंगावर हात घातला, कारण अगदीच क्षुल्लक असेल तरीही डोक्यात राग असेल तर माणूस काहीही करतो, आणि पोलिसांना कोणतीच बाजू सैल सोडून चालणार नव्हती. म्हणून त्या माणसाला देखिल पोलिसांनी बोलवून घेतले. त्याचे असे म्हणणे होते की त्याने असे काहीच केलेले नाही, एवढ्या तेवढ्या उधारीवरून जीव घेईल का कोणी. त्याला सोडून दिले, मात्र त्याच्यावर चोवीस तास नजर ठेवण्यात आली.

आता राहता राहिला प्रश्न दुसऱ्या प्रसंगाचा, मात्र त्यामध्ये संशय घेण्यासारखे काहीच नव्हते. पण पोलिसांचा तपास पुन्हा शून्यावर येऊन पोहोचला, संशय घेण्यासारखे कोण उरलेच नव्हते आणि सखारामला न्याय वैगरे मिळावा म्हणून भांडणारे देखिल कोणीच नव्हते. आणि जे होते त्यांना त्याच्या जाण्याचा आनंद झाला नसला तरी, दुःखही झालेले नव्हते. त्यामुळे काही दिवसात ही केस अशीच पडून राहिली.

केस बंद झाली असली तरी प्रश्न तर होतेच, सगळ्यांच्याच मनात होते नक्की सखारामला मारले कोणी आणि का?

सखारामच्या घरातल्यांना जसा आनंद किव्हा दुःख झाले नव्हते, तसेच आणखीही कोणीतरी होते. कृत्य जरी रागात येऊन केलेले असले तरी त्याचा पश्र्चात्ताप अगदीच नव्हता, कदाचित त्यांच्यालेखी तीच शिक्षा सखारामसाठी योग्य होती.

सखाराम नेहमी प्रमाणे दारूच्या धुंदीत बुडालेला होता, आणि त्याच गोष्टीचा फायदा या दोन बहिणींनी घेतला. गावाच्या निर्जन रस्त्यातून सखाराम रात्री येत असताना, त्याला एका झाडावर एवढ्या जोरात ढकलायचे की त्याच्या डोक्याला मार बसला पाहिजे. तसाही तो दारूच्या नशेत असल्यामुळे स्थिर नसणारच त्यामुळे त्याला ढकलणे एवढे कठीण नव्हतेच. मात्र डोक्याला मार जीवघेणा बसला पाहिजे याची काळजी घेतली. आणखीही गोष्टी लक्षात घेतल्या गेल्या जस की, हॅण्ड ग्लोव्हज, कोणतीही अशी गोष्ट बरोबर घ्यायची नाही की ती पडेल आणि त्यावरून कोणाला संशय येईल जसे की दागिने. संपूर्ण आकडेवारी करूनच खून केला गेला.

पण का?

दुसरा प्रसंग आठवतोय, हो कदाचित जसं पोलिसांना ते कारण शुल्लक वाटलं, तस कोणालाही वाटूच शकतं, पण ज्यांचा सगळा जीव प्राण्यांमध्ये अडकलेला असतो त्यांना त्यांच्या जाण्याने जग इकडचं तिकडे झाल्यासारखं वाटत असतं. मग या अशा प्रसंगांमध्ये काही लोक स्वतःला दोष देतात की, आपला निष्काळजीपणा म्हणून असं झालं आपण नीट सांभाळायला पाहिजे होतं, त्या निष्पाप जीवाची काय चूक होती. त्यात सखारामसारख्या माणसांकडून या सगळ्या गोष्टी समजून घेण्याची अपेक्षा करणं म्हणजे मूर्खपणाच.

केतकी आणि अबोली च्या आयुष्यात ते कुत्र्यांचं पिल्लू खूप महत्त्वाचं होत, खूप कमी वेळात खूप जास्त लळा लागला होता. त्याच्या मागे धावता धावता दिवस कधी मावळायचा त्यांचं त्यांना देखिल कळायचे नाही.

त्यांचं दुःख त्यांनाच माहीत, कदाचित त्यांच्या घरातील लोकांना देखिल या दुःखाची कल्पना नव्हती, त्या प्रत्येक दिवशी स्वतःला हाच प्रश्न विचारत होत्या, की का असं झालं? काय चूक होती त्या निष्पाप जीवाची….?

पण आता नाही, मनातली सगळी वादळं आता शांत झाली होती.

ह्या पण कथा वाचा

लेखिका : सायली संकपाळ

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल