बाहेर पावसाच्या सरी बरसत होत्या आणि माझ्या अंतर मनातल्याही. ह्या किचन मध्ये पहिल्यांदाच पाऊल ठेवलं होतं. नवऱ्याने चहा सांगितला होता पण साखर कुठल्या डब्यात आहे, चहापत्ती कुठे आहे काहीच कल्पना नव्हती. विचारू तर कुणाला विचारू? घरात अवघे आम्ही दोघेच.
रडायला येत होतं, आईला तीन कॉल केले पण ती बहुदा अजून उठली नसावी म्हणून कॉल घेतला नसेल. एवढ्यात मागून एक हात आला, सुयश होता माझा नवरा. माझ्या मनाची चलबिचल त्याने ओळखली होती. त्याने साखर आणि चहापत्ती कुठे असते ते दाखवून दिलं. छान आल्याचा चहा कर असे सांगून त्याने किचन मधून एक्झिट घेतली.
आल्याचा चहा ऐकताच तिला काहीतरी आठवलं. जयवंतला तर कधीच आल्याचा चहा आवडला नाही. नेहमी म्हणायचा की जर आल्याचा चहा मला करून दिलास ना तर तुला माहेरी सोडेन. थट्टाच करायचा म्हणा पण त्याला आल्याचा चहा कधी आवडलाच नाही. ह्या उलट सुयशला आल्याचा चहाची तलफ होती. दोघेही किती वेगळे होते.
आता तुम्ही संभ्रमात पडला असणार की सुयश माझा नवरा आहे तर मग जयवंत कोण? हे माझं दुसरं लग्न होतं. जयवंत माझा पहिला नवरा. आमचं लव मॅरेज होतं. सर्व काही छान चालू होतं. त्याला चांगली नोकरी होती. सासू सासरे दोघेही सरकारी कर्मचारी होते आणि मी सुद्धा प्रायव्हेट कंपनी मध्ये चांगल्या हुद्द्यावर होते. पण कधी कधी सर्व चांगलं असलेले फार काळ टिकत नाही म्हणतात.
एका संध्याकाळी मी आणि जयवंत गाडीतून ऑफिस मधून घरी परतत असताना आमच्या गाडीला भरधाव येणाऱ्या टेम्पोने धढक दिली. त्या क्षणात डोळ्यापुढे अंधार झाला. काहीच दिसेनासे झाले. दरवाजा उघडून मी बाहेर फेकले गेले. काहीच वेळात होत्याच नव्हतं झालं माझ्या कंबरेला मार बसला होता. जिथे मी पडली होती तिथून हलता पण येत नव्हते. जयवंत मात्र अजूनही गाडीतच होता.
मी त्याला जोरात आवाज देत होते. आजूबाजूला लोक धावून आले. पण खूप उशीर झाला होता. टेम्पो मधील एक लोखंडी सळई जयवंतच्या डोक्याचा आरपार झाली होती. त्याचा जागीच मृत्यू झाला. त्या दिवशी मी बेशुद्ध पडले ते तीन दिवसांनंतर शुद्धीवर आले. सर्व काही संपले होते. माझा सोन्या सारखा संसार उध्वस्त झाला होता.
ह्या काळात माझ्या सासू सासऱ्याने मला खूप साथ दिली. आपल्या मुली प्रमाणे माझी समजूत काढली. पुढील पाच महिने मी घरा बाहेर सुद्धा पडले नाही. कसे समाजाला तोंड दाखवणार होते. पण माझ्या सासूनी काही ना काही कारणे देत मला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला. माझ्या आई बाबांनी मला घरी नेण्यासाठी खूप आग्रह केला. पण मी त्यांना ठामपणे सांगितले की मी जेव्हा ह्या घरात आले तेव्हापासून ह्या घरची झाले. आता माझी तिरडी च इथून जाईल.
सर्वांनी खूप प्रयत्न केला मला समजवण्याचा, तुझे वय तरी किती आहे, दुसऱ्या लग्नाचा विचार कर, अजून लहान आहेस, कुणीही चांगला मुलगा मिळेल पण माझ्या मनात जयवंत शिवाय दुसऱ्या कुणा मुलाला जागाच नव्हती. दोन वर्ष मी स्वतः ला सावरण्यात आणि घरच्यांना पुन्हा एकदा सुखात आणण्यासाठी व्यतीत केली. पण आज मात्र मी उदास होते. ह्याचे कारण सुयश होता.
सुयश माझा कॉलेज मित्र, काहीच दिवसांपूर्वी परदेशातून परत इंडिया मध्ये आला होता. इथेच काही करून त्याला आपला व्यवसाय वाढवायचा होता. त्याला जेव्हा माझ्या बद्दल कळलं तेव्हा त्याने माझे खूप सांत्वन केलं. मला पुढे जाण्यास प्रोत्साहन दिलं. आयुष्यात काही गोष्टी लिखित असतात. त्यामुळे आपण काहीच करू शकत नाही.
त्याने पुढचा मागचा विचार न करता मला लग्नासाठी मागणी घातली. मी त्याला स्पष्ट नकार दिला. पण तो ऐकणाऱ्यातला नव्हता. त्याने माझ्या घरी येऊन रीतसर माझ्या सासू सासरेना समजावून, तो माझ्यासाठी कसा योग्य आहे ते पटवून दिलं. माझे घरचे सुद्धा माझ्या लग्नासाठी विचार करत होते आणि मुलगा माझ्याच ओळखीचा आहे म्हणून सर्वांनी होकार दिला.
पण मी मात्र शांत होते. ना हा बोलले ना नाही बोलले. माझ्या शांततेचे सर्वांनी होकार समजला. घरात पुन्हा एकदा सनई चौघडे घुमू लागले. माझ्या सासू सासऱ्यानी माझे कन्यादान करून मला आनंदाने पाठवले. एका नव्या जगात, नव्या जोडीदारासोबत. खरतर माझ्यासाठी हे खूप कठीण होते कारण सुयश नवी मुंबई मध्ये एकटाच राहत होता. लग्न होऊन जेव्हा मी साताऱ्याहून इथे आले तेव्हा खूप एकटे एकटे वाटतं होते.
पण सुयश ने मला खूप समजून घेतले. कधीच असे भासवले नाही की माझं हे दुसरं लग्न आहे. मला ही हे नातं आधी थोडं वेगळं वाटतं होतं पण मला माहित होतं. हळूहळू ह्या नात्याची सवय मला होणार आहे. पण हे ही तितकेच माहित आहे की जयवंत माझ्या मनातून सहजासही बाहेर पडणार नाही.
ह्या कथा पण वाचा
समाप्त
कथेचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत, लेखकाच्या नावासोबत कथा शेअर करायला हरकत नाही.
लेखक : पाटीलजी (आवरे उरण, रायगड)
1 comment
[…] दुसरं लग्न […]