Home कथा नवरा नसलेले स्त्रीचे आयुष्य

नवरा नसलेले स्त्रीचे आयुष्य

by Patiljee
25810 views
नवरा नसलेल्या स्त्रीचे आयुष्य

आई अग उद्या शाळेत पालक मीटिंग आहे. उद्या काही करून वेळ काढ आणि माझ्या सोबत चल, दरवेळी तू काही ना काही कारणे देऊन येत नाहीस आणि मग वर्ग शिक्षक मला ओरडतात. अग बेबी खरंच नाही जमणार ग उद्या, मला खूप कामे आहेत. समजून घे पोरी. आई तुझे हे नेहमीचे आहे. माझे बाबा असते ना तर ते नक्कीच नेहमी आले असते. तू बाबांची जागा कधीच घेऊ शकत नाहीस. एवढे बोलून परी तिथून निघून गेली.

बाबा असते तर आले असते हे वाक्य मालती ताईंच्या अंतरमनात घुसले. मालती ताई आणि सुभानराव ह्यांनी पळून जाऊन संसार थाटला होता. पण म्हणतात ना बालिश वयात घेतलेले निर्णय कधी कधी फसतात. तेच ह्यांच्या बाबतीत सुद्धा झाले. लग्नाला दीड वर्ष झाला आणि सुभानराव मालती ताईंना सोडून निघून गेले कधी न परतण्यासाठी. हातात दोन महिन्यांची मुलगी आणि पुढील आयुष्य घेऊन मालती ताईने संसाराचा गाढा ढकलला.

पळून जाऊन लग्न केल्याने घरच्यांनी सुद्धा तिला स्वतः पासून लांब केले होते. त्या इवल्याश्या जीवाला घेऊन त्यांनी स्वतःचे विश्व निर्माण केले. आज परी १६ वर्षाची झाली होती आणि तिला एवढं लहानाचं मोठं करून आता ती म्हणते बाबा असते तर चांगलं झालं असतं. दिवसभर हाच विचार करत मालती ताईंच्या डोळ्याला डोळा लागला नाही.

नवरा नसलेल्या स्त्रीचे आयुष्य

नजीकच्या कारखान्यात गेली अनेक वर्ष त्या साफ सफाई कामगार म्हणून काम करत होत्या. अवघा १६ हजार पगार त्यात मुलीचे शिक्षण, घर भाड आणि इतर सांसारिक गोष्टी सांभाळत होत्या. एक दिवस जरी कामावर नाही गेल्या तर त्या दिवसाचा पगार कापला जात होता. पण ह्या गोष्टी परीला सांगून समजणार नव्हत्या. कारण तिचे हे वय आता समजण्यापलीकडचे होते.

अरे संसार संसार

गेली १६ वर्ष मालती ताईने आपल्या मुलीला घेऊन कसे आयुष्य काढले हे फक्त त्यांनाच माहीत होत. नवरा नसलेली बाई इतर पुरुषासाठी खुल्या तिजोरी सारखी असते असे त्या प्रत्येकाना वाटतं. अनेकांनी मालती ताईंना भुळवण्याचा प्रयत्न केला होता. कुणी प्रेमाचे तर कुणी पैशाचे आमिष दाखवले होते.

पण त्यांना त्यांच्या आणि परीच्या आयुष्यात कुणा तिसऱ्या व्यक्तीची गरज नको होती. त्यांना माहीत होत मी जर लग्न केले तर माझ्या परीला हवं तसं प्रेम मिळणार नाही. १२ वर्षापूर्वी बाजूच्याच गावातील एका इसमाने रीतसर त्यांना लग्नाची मागणी घातली होती. पण त्यांची एक अट होती ती म्हणजे परीला ते स्वीकारू शकत नव्हते. परी नाही मग मी जगून करणार तरी काय? म्हणून त्यांनी ह्या स्थळाचा विचारच केला नाही आणि आपल्या मुलीला प्राधान्य दिलं.

आता माझ्या मुलीसाठी मी जगणार, तिला खूप मोठं करणार असा निर्धार त्यांनी केला होता. रोज बारा बारा तास काम करणे कधी ओवर टाइम करून मिळेल तेवढे पैसे साठवणे हा त्यांचा दिनक्रम होता. मुलीचे शिक्षण हाच ध्यास त्यांनी उराशी बाळगला होता. पण परी मात्र नेहमी आपल्या आईवर चिडचिड करू लागली होती.

लॉक डाऊन आणि तिच्या आठवणी

फाटक्या साडी का घालते? जेवायला नेहमी त्याच त्याच भाज्या का असतात? रोज उशिरा घरी का येतेस? मला वेळ का देत नाहीस? इतर मुला मुलींच्या आई बाबा सारखे मला मॉलमध्ये का घेऊन जात नाहीस? मला दर सहा महिन्यातून नवीन कपडे का मिळतात? प्रत्येक महिन्याला का मिळत नाही? मला एवढाच पॉकेट मनी का दिला जातो? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे ती मालती ताईकडे मागत असे. पण तिला त्या काय आणि कसं कसं समजावणार होत्या.

स्वतःसाठी आयुष्य जगणं सोडून त्या मुली साठी आयुष्य जगत होत्या. शेवटची स्वतःसाठी साडी कधी घेतली होती किंवा चेहऱ्याला शेवटची पावडर तरी कधी लावली होती हे सुद्धा त्यांना आठवत नव्हते. जिच्यासाठी हे सर्व करतेय तिच मला समजून घेत नाही अशी खंत त्यांना नेहमी वाटायची. आता त्या फक्त हीच वाट पाहत आहेत की कधी एकदा माझी मुलगी समंजस होतेय आणि ह्या गोष्टी स्वतः समजून घेतेय. कारण श्रीमंत आणि गरीब ह्यातली दरी खूप मोठी असते.

नवरा नसलेल्या स्त्रीचे आयुष्य

ह्या दरीत आपण अडकलो की अडकलोच. मग त्यातून बाहेर कसे पडायचे हे पूर्णतः आपल्या हातात असते. पण इथे मात्र मालती ताई अनेक संकटाना मात देऊन इथवर पोहोचल्या होत्या. पण सध्या चालू असलेले युद्ध कुणा बाहेरील व्यक्तीशी नव्हते तर आपल्या मुलीशी आणि अंतरमनाशी होते. खरंच एवढं वाईट असतं का नवरा नसलेल्या स्त्रीच आयुष्य?

प्रेम लग्न आणि कोरोना

समाप्त

फीचर इमेज फ्रेम : तृप्ती खामकर

कथेचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत, लेखकाच्या नावासोबत कथा शेअर करायला हरकत नाही.

लेखक : पाटीलजी (आवरे उरण)

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल