बाबा आज उद्या मला बाहुली पाहिजे आणाल ना..? सांगा ना? बाबा ओ बाबा…? बाबांचे लक्ष नाही बघितल्यावर छकुली ने स्वतः जाऊन बाबांची धुंदी उडवली आणि पुन्हा म्हणाली बाबा मला उद्या त्या अमिता सारखी बाहुली पाहिजे. ती रोज मला दाखवते आणि चिडवत असते मी आईला बोलले होते तर आई म्हणाली सांगते मी बाबांना पण आज आठ दिवस झाले तरी तुम्ही आणली नाहीत म्हणून मग..

बापाचं काळीज ते, मोतीरामचा मुलीवर खूप जीव एकच मुलगी. तब्बल दहा वर्षांनी बायकोला दिवस गेले आणि छकुली झाली. झाल्या दिवसापासून त्याने छकुलीला लाडात वाढवली. पगार फक्त दहा हजार होता. तो कंपनीत काम करत होता पण सध्या लॉक डाऊन मुळे अनेक उद्योग धंदे बंद पडले आणि त्यात मोतीरामची कंपनी ही बंद पडली. त्यामुळे सध्या तो मिळेल ते काम करून घरात रोजचे भागवत होता. आणि त्यात छकुलीचा हट्ट कसा पुरवायचा? हाच एकुळती एक पोरगी पण तिचा साधा एक हट्ट ही मी पुरवू शकत नाही.. थु माझ्या जगण्यावर.
बायकोने ताटात वाढलेली भाकरी मोतीराम खात होता कसला चघळत होता म्हणा ना.. कारण त्याला अन्न गोड लागत नव्हते. बायको आणि पोरीला सुखाचे चार घास ही मी देऊ शकत नाही. माझ्या जगण्याना काहीच अर्थ नाही खरंच. असे म्हणत तो कशी तरी अर्धी भाकरी पोटात ढकलतो आणि वरून घटा घटा तांब्या भरून पाणी पितो. झोप तर आज येणार नव्हतीच रोजच्या सारखीच जीवाची घालमेल रोजचे विचार आणि टेन्शन याने झोप लागत नव्हती. पहाटे पहाटे कसा तरी मोतीरामचा डोळा लागला.
सकाळी उठला, अंघोळ केली, चहा घेतला आणि निघाला काम शोधायला. चांगलं काम मिळालं तर चार पैसे जास्त मिळतील या आशेने संपूर्ण शहर फिरत होता. एक दोन ठिकाणी मिळाले काम पण तिथून फक्त मिळून ३०० रुपये मिळाले होते. हे ३०० रुपये बाहुली साठी आणि घरात समान आणण्यासाठी काही पैसे लागतील. पण आता कुठून मिळवू पैसे? आणि काळोख ही पडत आलाय, घरातील वाट बघत असतील. पण तरीही मोतीराम थकला नव्हता. आता एक काम त्याला सुचले येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या थांबवायचा आणि त्या पुसून पैसे मागायचे. पोरीसाठी कोणतेही काम करायची त्याला अजिबात लाज नव्हती.

कसेतरी पैसे गोळा झाले की मी आनंदात घरी जाईन माझ्या छकुलीला बाहुली घेऊन खूप खुश होईल. ती आणि तिच्या चेहऱ्यावरील आनंद बघून माझा आनंद अभाळा इतका असेल. दोन गाड्या पुसल्या आता फक्त एक गाडी पुसली की झाले आज पुरते पैसे मिळतील. असे बोलून तो गाडीची वाट बघत राहिला. हायवे होता त्यामुळे भरपूर गाड्या येत जात होत्या. अशातच त्याला एक गाडी येताना दिसली म्हणून तो मागचा पुढचा विचार न करता सरळ उठला पण एक टेम्पो चुकीच्या साईड ने आला आणि त्याने मोतीरामला त्याच्या जोरदार टक्कर ने उडवून दिले.
इतक्या रात्री कोणीही त्याच्या मदतीला आले नव्हते डोळ्यासमोर पोरीचा चेहरा आणि हातात गोळा झालेल्या पैशाकडे बघता बघता मोतीराम ने जीव सोडला. इथे घरी मात्र दरवाजा समोर उभी राहून छकुली वडिलांची वाट पाहत आहे. माझे बाबा मला आता बाहुली घेऊन येतच असतील ह्या आशेने ती उभी आहे. पण तिला हे ठाऊक नाहीये की तिचे बाबा हे जग सोडून निघून गेले आहेत, कधी न परतण्यासाठी.
ह्या मराठी कथा सुद्धा वाचा
समाप्त
कथेचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत, लेखकाच्या नावासोबत कथा शेअर करायला हरकत नाही.
लेखक : पाटीलजी (आवरे उरण)
2 comments
[…] बाबा […]
[…] बाबा […]