का कुणास ठाऊक पण आज पहाटेपासून मन अस्वस्थ वाटत होतं. काहीतरी विपरीत घडणार असच काही राहून राहून वाटत होतं. वयाच्या पन्नाशीत असे वाटणे स्वाभाविक आहे. पण तरीही एक दडपण मनावर जाणवत होते. मुलांना फोन केले, नातवंडांसोबत बोललो, सूनांची चौकशी केली. सर्व ठीक होत मग हे दडपण कसलं आहे काही कळलं नव्हतं. आतून सौ ने आवाज दिला तुमचे सर्व झाले असतील कॉल करून तर शांत बसता का आता?
तिच्या ह्या प्रश्नाने हरवलेला मी माणसात तर आलो पण मनाला रुखरुख लागलीच होती. आमच्या सौ ने चहा आणून दिला. सोबत बसून वर्तमानपत्र वाचण्यात आणि चहाचा आनंद घेण्यात दंग झालो. आता तुम्ही म्हणाल ह्या बदलत्या काळात चहा घेताना कोण वर्तमानपत्र वाचन बसतो? पण मला मात्र चहा घेता घेता वर्तमानपत्र वाचण्याची आधीपासूनच सवय. त्याशिवाय घशाखालून चहा सुद्धा उतरत नसतं.
काय मग बायको काल नातू घरी नाही आले तर चिडचिड झाली म्हण तुझी.अरे आपली मुलं कामानिमित्त शहरात राहतात आणि निवृत्ती नंतर गावाकडे राहिलेले आयुष्य व्यतीत करण्याचा निर्णय आपलाच होता ना? मग आता ही चिडचिड कशाला? मुलांना जॉब असतो, नातवंडांना शाळा कॉलेज असतात. त्यांना सुट्टी मिळाली की येतील ते घरी. अहो तुमचं म्हणणं बरोबर आहे पण माझे एकच म्हणणं होतं की होळीला सर्वांनी गावी यावे पण धाकटे चिरंजीव सांगत आहे ऑफिस मधून सुट्टी मिळू शकत नाही म्हणून थोडी चिडचिड झाली.
अग बायको प्रत्येक होळी आपण सोबत साजरी करतोच ना? मग ह्या वर्षी नाही जमले त्यांना तर पुढच्या वर्षी येतील की, आपणच समजून घेतेल पाहिजे ना त्यांनाही, असे बोलत आम्ही चहाचा प्रोग्राम चालूच होता तेवढ्यात गणू धापा टाकत टाकत धावत आला. “आजोबा आजोबा ते तिकडं ते” त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडत नव्हते. मी त्याला शांत केले पाणी प्यायला दिलं, आणि मग विचारले काय झाले गणू? आजोबा लय विपरीत झाला वो, तुमचा जिगरी मैतर नाय रायला बघा, त्यांचं रात्री आकस्मात निधन झालया.
त्याचे हे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रूंचा बांध वाहू लागला. सौ ने अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला खरा पण तो व्यर्थ ठरला. कारण बालवाडी पासून ते पन्नाशी पर्यंत चे आम्ही मित्र आणि त्याची ही अशी अचानक एक्झिट मनाला चटका लाऊन जाणारी होती. कालपर्यंत ठीक असलेला माझा मैतर आज देवाघरी गेला म्हणून मला जास्त त्रास होत होता. तेव्हाच मला सकाळपासून काहीतरी विपरीत घडणार असं वाटतं होतं. आणि हे अघटीत घडलं आणि होत्याचं नव्हतं झालं. देव पण अशाच व्यक्तींना लवकर देवाघरी बोलावून घेतो जे खूप चांगले असतात.
त्याच्या आठवणीत रडण्या पलीकडे मी काहीच करू शकत नव्हतो कारण ह्या पृथ्वीतलावर ज्यांनी ज्यांनी जन्म घेतला आहे तो कधीतरी एक दिवस हे जग सोडून जाणार हे अटळ आहे.
मित्रांनो सर्वांना कधी ना कधी हे जग सोडून जायचच आहे त्यामुळे असे जगा की गेल्यानंतरही अनेकजण आपल्याला नावाने नाही तर आपल्या विचाराने ओळखले पाहिजे.
लेखक : पाटीलजी