Home कथा मी चप्पल बोलत आहे

मी चप्पल बोलत आहे

by Patiljee
311 views

माझा मालक एक मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलाय म्हणून त्याला खर तर माझी किंमत कळली आहे. म्हणून तो मला नवीन घेतल्यापासून माझा वापर करत आहे. एखाद्या श्रीमंताच्या पायात गेले असते तर कदाचित धूळ खात बसले असते. पण तरीही माझ्या मनातील काही गोष्टी आहेत त्या आज मी तुमच्यापुढे मांडत आहे. माझा रंग तसा साधारण पांढरा आणि निळ्या दोन पट्ट्या बस इतकीच माझी ओळख.

आज माझा मालक मार्केट मध्ये जातो आणि एका साधारण चपलांच्या दुकानात जाऊन खूप चपला पाहिल्यानंतर त्याने माझी निवड केली. आता माझी निवड का केली असावी या दुकानात पैशाची खूप घासाघीस केल्यानंतर थोड्या कमी किमतीत मी त्याला मिळाले, घरी आल्यावर त्याने मला म्हणजेच चपलेला आपल्या घरातील सर्व सदस्यांना दाखवली सर्वांना मी खूप आवडले.

त्यानंतर रात्री मालकाचे जेवण झाल्यानंतर मला पायात चढवून तो कुठेतरी निघाला, माहीत नाही पण आनंदात होता. थोडा वेळ चालल्यानंतर एका घोळक्यात शिरला त्याने कोणाला हाय केले तर कोणाला शिवी देऊन हाय केले. हीच पद्धत मध्यमवर्गीयां मध्ये एकमेकांना भेटण्यासाठी असते, स्पेशल तरुणांमध्ये चालते. सगळेजण एका ठिकाणी बसल्यानंतर “भाई नवीन चप्पल घेतलीस पार्टी कधी देणार” या वाक्यावर सगळा ग्रुप हसला आणि माझा मालक घरी जायला निघाला. जाताना थोडी घेतली होती, म्हणून चालताना पाय एकमेकांत गुंतत होते.

मला अजूनही कळले नाही की लोक पितात कशासाठी, म्हणजे पिऊन मिळते तरी काय? पुन्हा पिताना तोंड वाकडे तिकडे करायचे आणि प्यायची, याला काय अर्थ आहे? जाऊदे हे व्याकरण समजण्या पलीकडचे आहे. मालक घरासमोर आला मला पायातून काढले आणि घरात शिरला घरातून थोडीफार बाचाबाची झाली असे आवाज येत होते पण कदाचित ते रोजचेच असावे.

दुसऱ्या दिवशी मालक मला पायात चढवून पुन्हा कुठे तरी निघाला, विचार केला कुठे बर जात असेल? तर शेतावर यांची स्वारी येऊन थांबली. मला बांधावर काढून हा माणूस शेतातील काम करायला निघून गेला. दिवसभर थकून घरी आला. मला बाहेर काढलं आणि आघोळीला गेला असे करता करता जवळ जवळ महिना झाला. त्याचा रोजचा नित्यक्रम चालूच होता. आणि रोज तो येताना जाताना मला पायात घातल्याशिवाय बाहेर पडत नसे. कधी शेतावर तर कधी भाजी आणायला तर कधी मटण तर कधी आणखी काही पण मला पायात घातल्याशिवाय तो बाहेर पडत नसे. मला वाटले की याला आता माझी खूप सवय झाली आहे हा माणूस माझ्याशिवाय राहूच शकत नाही?

पण एक दिवस सांगायची गोष्ट म्हणजे माझा मालक मला पायात घालून कुठेतरी बाहेर जाण्यासाठी घरातून निघाला, वाटले शेतावर जात असेल तर नाही तो एका मंदिरात चालला होता. म्हणजे रस्त्यात त्याने हार आणि नारळ घेतला आणि निघाला मंदिराच्या पायऱ्या चढणार इतक्यात त्याच्यासमोर एक भिकारी आला म्हणाला साहेब काहीतरी खायला द्या हो सकाळपासून काहीच खाल्ले नाही, पण माझ्या मालकाकडे ही तेव्हा पैसे नव्हते. त्याने पहिले इतक्या रणरणत्या उन्हात ही हा भिकारी बिना चपलेने उभा आहे. याच्या पायाला चटका नसेल का बसत, म्हणून माझ्या मालकाने चप्पल काढून थोडा जमिनीवर पाय ठेवला आणि जोराचा चटका पायाला लागला. माझे मालक थोडा विचार करत तिथेच पायरीवर बसले हातात नारळ होता तो त्या भिकाऱ्याला दिला. खिशात दहा रुपये होते ते ही दिले आणि पायातील चप्पल ही काढून दिली.

देव काय नारळ खाणार नाही त्यापेक्षा हा भिकारी तरी खाईल आणि चप्पल काय उद्या पगार होईल तेव्हा घेऊन नवीन, पण हा भिकारी याला रोजचे खायचे वांदे तर हा चप्पल कुठून घेणार? आणि म्हणून माझ्या मालकाने मला त्या भिकाऱ्याला सुपूर्त केली, खरंच माझा मालक जरी पैशाने श्रीमंत नसला तरी मनाने खूप श्रीमंत होता त्याची आठवण मला आता रोजच येईल. चला आता जाते मी ह्या भिकारी असलेल्या माणसाच्या पायात. मला कसले काय भिकारी, मला सर्व सारखेच. चला भेटते तुम्हाला काही दिवसांनी परत.

लेखन : पाटीलजी

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल