Home कथा कॉलेजवाली लवस्टोरी भाग २

कॉलेजवाली लवस्टोरी भाग २

by Patiljee
830 views

बऱ्याच वर्षांनी सर्व एकत्र भेटलो होतो म्हणून आम्ही खुश तर होतोच पण एकेमकांची टिंगल सुद्धा करत होतो. कुणाचे पोट सुटले होते तर कुणाचे केस गळती चालू होती. अश्याच आमच्या केनी सरांनी नेहमी प्रमाणे आम्हाला चांगले मार्गदर्शन केले. त्यांचे ह्या वयातील ते चेहऱ्यावरील तेज पाहून असेच वाटतं होत की आपण पण वयाच्या उतरत्या काळात असेच सरांसारखे चिरतरुण राहिले तर किती छान होईल ना. एव्हाना तीन तास झाले तरी शबाना अजुन पोहोचली नव्हती, मला सीमा समजावत होती येईल ती निघाली आहे पण एवढ्या वर्षांनी तिला पाहायचे होते त्यामुळे मन जाग्यावर स्थिर नव्हते.

तिच्या विचारात मन कधी भूतकाळात हरवलं माझे मला कळले नाही. आजही आठवतोय तो कॉलेजचा पहिला दिवस. पहिल्याच दिवशी मी गगन आणि अजय कॅम्पस मध्ये बसलो होतो. अर्थातच कुणी नवीन मुलगी आपल्या कॉलेजमध्ये येणार आणि सर्व प्रथम आम्ही तिला पाहणार हाच उद्देश होता. अनेक मुली आल्या गेल्या पण जेव्हा शाबनाची एन्ट्री झाली तेव्हा मात्र जणू असे वाटू लागले आजूबाजूचे सर्व स्तब्ध झाले आहेत. माझ्या मागे कुणी छान बॅकग्राऊंड संगीत वाजवत आहे. हवेच्या लहरी जणू हेच सांगत आहेत की ही वेळ तुझी आहे आणि समोर आलेली मुलगी सुद्धा तुझी जीवनसाथी आहे.

अजयने मला भानावर आणले. अरे काय मया कुठे हरवला तू? त्या बुरख्यातील मुलीकडे एवढं काय पाहतोय रे? अज्ज्जा यार काहीतरी मनात होतेय रे, एवढ्या वर्षात कधी वाटलं नाही असं काही मनाला जाणवत आहे. त्या मुलीचे फक्त डोळे दिसत आहेत आणि ह्याच डोळ्यांच्या मी प्रेमात पडलो आहे. माझे वाक्य अर्धवट तोडत गगन म्हणाला “भाई गप तो का आता? ती दुसऱ्या धर्माची आपण दुसऱ्या धर्माचे पुढे जाऊन काहीही त्रास नको. त्यामुळे जास्त विचार करू नकोस चल क्लासमध्ये जाऊयात”

गगनला काय म्हणायचं होतं हे मला चांगलेच कळलं होतं. पण सध्या प्रेम करताना कोण जात धर्म पाहतो. प्रेम हे निखळ असले पाहिजे तरच ते आयुष्यभर राहत. असे मी स्वतःला धीर देत क्लासमध्ये शिरलो. माझे नशीब म्हणा किंवा इतर काही पण ती मुलगी पण आमच्याच क्लास मधे येऊन बसली. मग काय आता वर्गात माझे शिक्षकांकडे कमी आणि तिच्याकडे जास्त लक्ष असायचे. माझ्या एका मैत्रिणीकडून मला कळलं की तिचे नाव शबाना आहे. किती गोड नाव होत हे, मला खूप जास्त आवडलं होतं. खरं तर आपण ज्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो त्या व्यक्तीच्या सर्व गोष्टी आपल्याला आवडू लागतात.

त्याचे चालणे, त्याचे बोलणे, त्याचे हसणे, त्याचे परिधान केलेले कपडे (मग ते कितीही घाणेरडे कॉम्बिनेशन असले तरीही) अगदी सर्वच काही आवडू लागतं. तसेच मला शबानाच्या सर्व गोष्टी आवडू लागल्या होत्या. पण तिच्याशी बोलणार कधी आणि कसं हे मला सुद्धा कळतं नव्हतं. तीन महिने पालटून गेले तरी मी फक्त आणि फक्त तिला पाहत होतो. एव्हाना तिलाही हे कळलं असेल मी तिला रोज चोरून चोरून पाहतोय पण तिनेही समोरून कधी बोलण्याचा प्रयत्न केला नाही. अखेर एक दिवस तिने स्वतः येऊन मला आवाज दिला. महेंद्र मला तुझी नोटबुक देशील? माझे लिखाण थोड अपूर्ण आहे. तिलाही माझ्याशी बोलायचं होते त्यामुळे हे फक्त कारण होत आणि मी तिला नोटबुक देऊन टाकली. पण नंतर मला कळलं होतं की आज संध्याकाळी ही नोटबुक मी अजयला देणार होतो. आता तो मला खूप पिडणार हे मला कळून चुकल होतं.

हळूहळू माझ्या आणि शबानामध्ये ओळख वाढू लागली होती. आम्ही रोज लंच टाइम मध्ये जेवणही एकत्र करू लागलो होतो. सर्व काही मस्त सुरळीत चाललं होतं. एक दिवस मात्र ती रडत रडत माझ्याजवळ आली. महेंद्र तुझ माझ्यावर प्रेम आहे का? अशी मला रडत रडत म्हणाली. तिचा हा अनपेक्षित प्रश्न माझ्यासाठी खूप वेगळा होता कारण कधीच आमच्यात असं काही बोलणे झालेच नव्हते. माझे तिच्यावर प्रेम आहे कबुल होत पण तिचे आहे का नाही हे मला अजुन कळले सुद्धा नव्हते.

का ग काय झालं? अशी अचानक काय हे मधेच विचारत आहेस? अरे बघ ना ती विशाखा मला चिडवते आणि म्हणते तुमच्या दोघांमध्ये प्रेम आहे आणि हे मलाच काय तर संपूर्ण कॉलेजला माहीत आहे. तिचे हे बोलणे ऐकून मी खूप खूष झालो होतो. कारण कधीच माझ्या मनातल्या भावना मी तिला सांगू शकलो नव्हतो. आणि आज ती समोरून हे सर्व बोलते म्हणून जास्त खुश होतो. मी तिला शांत केले. एका जागेवर बसवून प्रेमाने समजावले.

ये देख शबाना लोकांना बोलायला काहीही आवडतं. जेवढी तोंड तेवढे वेगवेगळे बोलणे. तुला आणि मला माहित आहे ना आपल्यात खूप छान मैत्री आहे. मग लोकांचा विचार का करतेस? अरे तू माझी स्ट्रोंग गर्ल आहेस. बिनधास्त राहा कुणाचा जास्त विचार करत जाऊ नको ग तू आणि हा हे अश्रू ह्या गुलाबाच्या फुलावर शोभत नाहीत. त्यामुळे आता रडगाणे बंद कर आणि चल क्लासमध्ये जाऊयात, निवास सरांचा क्लास आहे नाहीतर ते चिडचिड करतील आपल्यावर.

माझ्या मनातील भावना तिच्यासमोर व्यक्त करण्याची खूप मोठी संधी माझ्यासमोर चालून आली होती पण तिचे अश्रू पुसण्याचा नादात नी ती गमावून बसलो होतो. बघता बघता लास्ट इअर सुद्धा आले. कॉलेज संपायला अवघा दीड महिना बाकी होता. आमची मैत्री अजूनही घट्ट झाली होती. पण मैत्रीच्या पलीकडे कधी जाताच आलं नाही. पण काही महिने मी पाहत होतो शबाना अस्वस्थ वाटत होती. तिला मी अनेकदा ह्या मागचे कारण विचारले पण तिने नेहमीच टाळाटाळ केली.

भाग तीन इथे क्लिक करून वाचा

लेखक: पाटीलजी

Please follow and like us:

Related Articles

1 comment

लग्नानंतर जेव्हा कॉलेजचं प्रेम समोर येतं » Readkatha August 30, 2020 - 6:12 am

[…] कथेचा दुसरा भाग इथे क्लिक करून वाचा […]

Reply

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल