अहो कधीपासून तुमचा फोन वाजतोय बघा उचला लवकर की उचलू मी, बायकोने रागातच मला किचन मधून आवाज दिला. अग हो हो अंघोळ तर होऊदे माझी, कॉलपेक्षा अंघोळ महत्त्वाची माझी. हो माहितीये माहितीये अर्धा एक तास लागतो तुम्हाला पण कधीपासून हा फोन टिव टिव वाजतोय ते पहा. एव्हाना फोनमध्ये चार मिस कॉल येऊन गेले होते. अनोळखी नंबर होता त्यामुळे मी परत कॉल बॅक केला पण समोरून कुणी उचलला नाही. म्हणून माझी सर्व कामे आटोपून मी ऑफिस साठी रवाना झालो.
बाईकवर असताना सुद्धा एक दोन मिस कॉल येऊन गेले. आधीच उशीर झाला होता म्हणून मी लक्ष नाही दिला पण ऑफिसमध्ये पोहोचल्यावर जेव्हा नंबर पाहिला तेव्हा कळलं की सकाळी ज्या नंबरवरून कॉल आले होते तोच हा नंबर होता. मी परत एकदा कॉल केला. आता मात्र समोरून फोन उचलला गेला. काय शेठ किती कॉल करायचे तुम्हाला, आहात तरी कुठल्या दुनियेत? असा समोरून गोड मुलीचा आवाज कानी पडला. मी परत एकदा नंबर पाहिला पण नक्की कोण होत हे कळायला मार्ग नव्हता.
मी समोरील मुलीला म्हटलं मॅडम तुमचा चुकून फोन लावला आहे, मी तुम्हाला ओळखत नाहीये. पण समोरून सुद्धा त्याच त्वेशात आवाज आला. अरे महेंद्र नंबर बरोबर लागला आहे मी सीमा बोलतेय. तुझी कॉलेज फ्रेंड, तीन वर्ष सोबत होतो आपण एवढंही विसरला का तू आता? मी थोडा गोंधळून गेलो कारण आज कॉलेज सोडून आम्हाला सात वर्ष झाली होती. प्रत्येकजण आपल्या चंदेरी दुनियेत व्यस्थ होता.
मला आजही आठवतेय आमची ती बॅच ज्यात फक्त २३ मुली आणि आम्ही ३५ मुले होतो. २०१० ते २०१२ ह्या वर्षात आम्ही खूप दंगा केलाच होता. वर्गातील क्लासमेट सोबत आपआपसात दंगा तर व्हायचा पण जेव्हा हाच पंगा इतर क्लास मधील मुलांशी झाला की आम्ही सर्व एकत्र भांडायला तयार असायचो. आमचे केनी सर नेहमीच आम्हाला सल्ले द्यायचे. शिका शिका आणि पुढे जा, शिक्षण कमी राहिले तर समाजात तुम्हाला योग्य मान मिळणार नाही आणि हो गोष्ट आता करू तुम्ही मस्तीत घेतलीत तरी पुढे जाऊन तुम्हाला ह्या गोष्टीचा विचार पडतील.
त्यांचे हे शब्द तेव्हा जरी आम्ही ऐकले नसले तरी आज जेव्हा समाजात चांगले शिक्षण घेऊन जो मान मिळवला आहे. चार लोकं आपल्याबद्दल चांगले बोलतात हे ऐकुन केनी सरांचे ते वाक्य आठवले मी असं वाटतं आपण नक्कीच आयुष्यात काही चांगलं केलं आहे. मी ह्या भूतकाळातील विचारात गुंग असताना सीमा कॉलवर होती मी हे विसरूनच गेलो होतो. अरे कधीपासून हॅलो हॅलो करतेय मी, कुठे हरवला लगेच तू? हा बरोबर आपल्या कॉलेजचा दुनियेत गेला असणार ना साहेब? या बाहेर या ह्यातून जरा एक आनंदाची बातमी देतेय.
आपल्या क्लास मधील काही मुलं मिळून एक रियूनियन करण्याचे आम्ही ठरवले आहे. येत्या शनिवारी म्हणजेच सात तारखेला कॉलेजमध्ये सर्वांना भेटायचं आहे. त्यामुळे तुझे आताच काही प्रोग्राम असतील तर कॅन्सल कर आणि वेळ बुक कर आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी. तिचे हे बोलणे ऐकून माझ्या अंगात एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा संचारली. एवढ्या वर्षांनी आपण सर्व भेटणार हे ऐकुनच मी खूप खूष होतो.
सर्व भेटणार हे ऐकुन खुश तर होतोच पण शबाना बऱ्याच वर्षांनी भेटणार हे आठवून आठवून मन प्रफुल्लित होत होतं. अग सीमा सर्व येणार आहेत ना? सर्वच पाहिजे म्हणजे कसं मज्जा येईल. हो रे महेंद्र सर्व आहेत फक्त तू टांग नको देऊ बस. नाही ग मी तर येणार आहे पण नक्की सर्व येणार आहेत ना? महेंद्र शेठ माहीत आहे मला तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे. शबाना सुद्धा येणार आहे माझे तिच्याशी बोलणे झाले आहे. हे ऐकुन मी अजुन जास्त खुश झालो आणि येणाऱ्या दिवसाची वाट पाहू लागलो.
शेवटी तो दिवस उजाडला, रोज मी नऊ वाजता उठणारा व्यक्ती आज मात्र सात वाजता अलार्मच्या पण आधी उठलो. बायको सुद्धा मुद्दाम बोलून बोलून त्रास देत होती. आज बऱ्याच वर्षांनी जुन्या मैत्रिणी भेटणार म्हणून आमच्या ह्यांचे गाल बघा कसे लालेलाल झाले आहेत. पण मी तिला समजावत होतो असे काहीही नाही. पण बायको ती बायको, ती कधी ऐकणार आहेत का आपल्याला बोलण्यात.
घरापासून कॉलेज दीड तास अंतरावर होते. गाडी काढली आणि थेट कॉलेज गाठले. माझ्या अगोदरच आमचा पूर्ण ग्रुप येऊन पोहोचला होता. पोहोचल्या पोहोचल्या अजयने मला घट्ट मिठी मारली, आम्हा दोघांना पाहताच विजय धावत धावत येऊन त्याने सुद्धा आलिंगन दिले. हे पाहताच स्वप्नील, सीमा, गगन, विशाखा, मंडीप, शीतल आमचा सर्व ग्रुप जवळ येऊन आम्ही गोल रिंगण तयार केले. जणू काही क्रिकेट खेळतोय आणि आम्ही एक गडी बाद करून मस्त सेलिब्रेशन करतोय असे वाटतं होतं.
ह्या सर्वात मात्र माझी नजर तिला शोधत होती. माझी शबाना कशी दिसत असेल? ड्रेस घालून येईल की नेहमी प्रमाणे बुरख्यात येईल? असे अनेक प्रश्न माझ्या डोक्यात निर्माण झाले होते. माझे डोळे तिला पाहण्यासाठी आतुर झाले होते. हॉल मध्ये एवढी एसी चालू असताना देखील ती भेटणार म्हणून शरीरातून घाम बाहेर पडत होता. शरीर पूर्ण तापले होते. पण पार्टी होऊन दीड तास झाला होता तरी तिचा पत्ता नव्हता. ती येईल की नाही? कॉलेज मध्ये जशी मला अर्ध्यावर सोडून गेली अगदी तशीच आजही करेल का ती? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे मी शोधत बसलो होतो.
पुढे काय होणार? शबाना येणार का नाही? नक्की ह्या दोघांमध्ये काय असं झाले आहे जे अजुन आपल्याला कळलं नाही? असे अनेक प्रश्न तुमच्याही मनात असतील. तुम्हाला ह्या कथेचा दुसरा भाग वाचायला आवडेल ना?
कथेचा दुसरा भाग इथे क्लिक करून वाचा
मी लिहलेल्या ह्या कथा पण वाचा
समाप्त
कथेचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत, लेखकाच्या नावासोबत कथा शेअर करायला हरकत नाही.
लेखक : पाटीलजी (आवरे उरण)
1 comment
[…] महेंद्र असे कसे शक्य आहे. तू नीट पाहिलेस का? […]