Home कथा Friend Request

Friend Request

by Patiljee
984 views

एक काळ असा होता की नजरेने बोलले जात होते. कबुतर जा जा म्हणत प्रेमाचे पत्र सुरू व्हायचे. पण आता काळ बदलला आहे. ह्या सर्वाची जागा सोशल मीडियाने घेतली. आजकाल सर्वच सोशल मीडियावर होतं. चाट करणं, एकमेकांशी व्हिडिओ कॉलवर बोलणं आणि एवढेच काय तर आता शिक्षण सुद्धा सोशल मीडियावर अवलंबून आहे.

मला सुद्धा ह्या सर्व गोष्टी खूप मनापासून आवडतात. त्यात फेसबुक वापरणे म्हणजे जणू माझा छंद झालाय. असे म्हणा की माझा मित्रच झाला आहे. मी माझा जास्तीच जास्त वेळ हा फेसबुकवरच असतो. ह्याचे कारण म्हणजे माझा एकटेपणा. कारण जेव्हा पासून मी कामासाठी नवी मुंबईमध्ये शिफ्ट झालोय तेव्हापासून हवा तसा एकही चांगला मित्र मिळाला नाहीये. कदाचित कुणाची हवीतशी संगत आवडली नसावी.

नवी मुंबईमध्ये पनवेल शहरात जॉब करतो. जॉब चांगला आहे, पगारही सहा अंकी आहे. त्यात ऑफिसने राहण्यासाठी फ्लॅट सुद्धा दिला आहे. पण ह्यात एक गोष्ट खळते ती म्हणजे माझा एकांत. म्हणूनच मी माझा फावला वेळ फेसबुक वर स्क्रोलिंग करण्यात घालवतो. माझा अंगठा कमीतकमी चार ते पाच किमी प्रवास करूनच थांबत असेल. त्यात आता शॉर्ट्स व्हिडिओ चा ऑप्शन आल्याने ते बघता बघता कधी वेळ निघून जातो कळत सुद्धा नाही.

अशातच एक दिवस ती मला दिसली. ती म्हणजे सायली… सायली पंडित. नावातच गोडवा आहे ना? मी तिचा प्रोफाइल खूप वेळा पाहिला. क्षणभर तिच्या डीपी मधील फोटो कडे पाहून हरवून गेलो. तशी ती माझ्यासाठी अनोळखी होती पण मला ही ओळख वाढवायची होती. मी तिला Friend Request सेंड केली. आणि सोबत मेसेज पण केला. हॅलो.. पण समोरून काही उत्तर नाही आलं.

तिचा रिप्लाय आला नाही म्हणून मी दुःखी झालो नाही कारण माझ्यासोबत नेहमीच असे घडायचे. कुणी भावच देत नाही. ह्यात मुलींची सुद्धा चूक नाही. दिवसभरात त्यांना एवढे मेसेज येतात की अशा लोकांना इग्नोर करायची नवीन कला त्यांच्यात रुजू झाली आहे. अशातच नोटोफिकेशनचा आवाज कानी पडला. सायलीचा मेसेज होता.

Do i know you?

Still not but आपण एकमेकांना ओळखू शकतो.

का बोलायचे आहे माझ्याशी?

मला तुझा मित्र बनायला आवडेल.

का?

तुझ्या का चे उत्तर अजूनही माझ्याकडे नाही पण मला मनापासून वाटतेय आपण चांगले मित्र होऊ शकतो. तुला नाही आवडत का नवनवीन मित्र बनवायला?

नाही… मला नाही आवडत अनोळखी लोकांशी बोलायला.

मी लगेच माझे सर्व डिटेल्स तिला सांगितले. नवी मुंबई मध्ये राहतोय, पनवेलमध्ये जॉब करतो, घरी आई दोन लहान बहिणी आणि मी एकुलता एक मुलगा. आवड म्हणून लिखाण करतो. कधी कथा तरी कधी चारोळी. मनाला आवडेल बेभान होऊन लिहितो.

त्याच्यावर तिचे असे म्हणणे होते की तू लेखक आहेस? लेखक खूप बोरिंग असतात म्हणे. मग मी म्हटले अशा किती लेखकांना तू ओळखतेस? काही वेळ तिचा रिप्लाय नाही आला पण थोड्या वेळात असा मेसेज आला.

कुणाला नाही ओळखत आणि ओळखायची इच्छा पण नाही. Bye

मी पण bye म्हणत फोन बाजूला सरकवून दिला. थोडा वेळ खिडकीच्या बाहेर पाहत बसलो. मन लागत नव्हतं. घड्याळात पाहिले तर रात्रीचे अकरा वाजून गेले होते. सायली सोबत मी फक्त अर्धा तास चाट केली पण ह्या चाट मध्ये काहीतरी जादू नक्कीच होती. कारण माझे लक्ष सारखं सारखं मोबाईल कडे जात होते. पण तिचा पुन्हा मेसेज काही स्क्रीनवर झळकत नव्हता. सकाळी लवकर ऑफिसला जायचं म्हणून मी झोपी गेलो.

सकाळी उठल्या उठल्या आधी मला सायली सोबत झालेली चॅटिंग आठवली. म्हणून सकाळच मी तुला गुड मॉर्निंग असा मेसेज केला. काही वेळाने मेसेज रिड सुद्धा झाला पण रिप्लाय काही आला नाही. थोडा राग आला पण हेच आपले नशीब म्हणत दिवसाला सुरुवात केली. ऑफिसमधून जाऊन घरी आलो. जेवण बनवले, जेवायचे ताट हातात घेऊन टीव्ही समोर बसलो.

मोबाईल चार्जिंगला लावला होता. लांबुनच नोटिफिकेशनचा आवाज कानी येत होता. मनात थोडी चलबिचल सुरू होती. तिचेच मेसेज असतील का? पाहू का जाऊन? नको आधी जेऊन घेतो? जाऊदे जेवता जेवता मोबाईल पाहीन म्हणून जेवणावरून उठून मी मोबाईल घेतला. माझी शंका खरी ठरली. तिचे तीन मेसेज होते.

Hi
Helo
Jevlas ka?

कोणत्याही मुलीने जेवलास का? असे विचारल्यावर किती आपलेपणा वाटतो ना? जणू कुणी आय लव यू म्हटलं आहे अशीच फिलिंग येते. मी पण तिला जेवणाच्या ताटाचा फोटो काढून जेवायला ये असा मेसेज केला. तिने ओके म्हणून मेसेज केला. मी पण रिप्लाय नाही केला. आधी पूर्ण जेऊन घेतलं आणि फोन घेऊन बाल्कनीत बसलो. मी नोटिफिकेशन पाहिले तर सायलीने माझी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली होती.

सायली अजून ऑनलाईन होती. मी लगेच Hi असा मेसेज केला. तिने सुद्धा Hi पाठवलं.

तू अजून माझ्यावर रागावली आहेस का?

रागावली असती तर तुझी Freind Request स्वीकारली असती का?

हे ऐकून मी तिला एक smily पाठवला. तिनेही मला एक Smily पाठवले. हे Smily पण किती सुंदर असतात ना. न बोलताच अनेक भावना बोलून जातात. मी म्हटलं.

तुला खरंच राईटर बोरिंग वाटतात?

नाही असे काही नाही, त्या दिवशी थोड रागात ते असेच म्हटले. तू काय लिहितोस?

मी प्रेमकथा छान लिहितो. अनेक अशा कथा आहेत ज्या लोकांना आपल्या मनाच्या जवळच्या वाटतात. पण आता काहीतरी छान लिहायचं आहे. डोक्यात कधी पासून आहे की कादंबरी लिहावी. करेन सुरुवात लवकरच.

Ohh wow that’s great.

अशीच चाट सुरू असताना ती गुड नाईट म्हणत झोपी गेली. हे आमचे चॅटिंग प्रकरण आता रोज सुरू झालं. कधी दुपारी बोलणं व्हायचं तर कधी रात्री.  माझा दिवस कसा गेला हे तिला सांगितल्याशिवाय मला झोपच येत नव्हती. आम्ही एक महिना असेच चाटमध्ये बोललो. मला तिची सवय झाली होती, भेटायची इच्छा होत होती. मग मीच विषय काढला.

तू एवढी छान बोलतेस तर तुझा आवाज सुद्धा एवढाच गोड असेल ना? फोनवर बोलू शकतो का?

अजिबात नाही… जेव्हा मला वाटेल नंबर द्यावा तेव्हाच मी देईन.

ती नाही म्हटल्यावर मी विषय टाळून नेला. दोन दिवसांनी आम्ही चाट करत असताना अचानक तिने मेसेज केला.

काय राव.. आज नेहमीचा माणूस वाटतं नाही आम्हाला? शांत शांत वाटतेय. सर्व ठीक आहे ना?

हो ठीक आहे.. घरच्यांची आठवण येतेय. एकटं वाटतेय आज थोडं.

अच्छा.. 80806****3 हा माझा नंबर आहे. कर कॉल बोलूया आपण थोडं.

नंबर मिळताच माझा आनंद गगनात मावेनासा झाला. मी लगेच तिला फोन केला. हॅलो…. तिने पण हॅलो म्हटलं पण तिचा आवाज खूप बारीक येत होता. कदाचित घरात असेल म्हणून हळू बोलत असेल असा अंदाज मी बांधला.

का आज एक वाटतेय?

नाही.. आता ठीक आहे मी.

एवढ्या लवकर ठीक पण झालास?

हो मग.. आता तुझ्याशी बोलणे जे होतेय.

एक गोष्ट मला खरी खरी सांग तू काय विचार करून मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती?

मी जेव्हा पहिल्यांदा तुझा प्रोफाइल फोटो suggest मध्ये पाहिला तेव्हा फक्त त्या फोटोकडे पाहताच राहिलो. देवाने तुला खूप विचार करून बनवले असेल. तूझ्या डोळ्यात एक तेज आहे. असे वाटते तासनतास मी त्याकडे पाहत बसावे. तूझ्या ओठाखाली असणारा तो तील कदाचित रब ने किसी की बुरी नजर ना लग जाये इसीलिये आपको दिया हैं. ती फक्त हसत होती आणि म्हटलं तुझं नाव पण किती गोड आहे. सायली. ह्या नावातच सर्व सामावून घेण्यासारखे आहे. एवढं सर्व पाहून माझे माझ्या मनावर कंट्रोल नाही राहिलं. कधी तुला फ्रेंड रिक्वेस्ट सेंड झाली हे माझे मलाही कळले नाही. माझ्या ह्या बोलण्यावर ती फक्त हसत होती.

हसता हसता ती म्हणाली अरे…तो फोटो माझा नाहीये. आता कसे आणि काय सांगू तुला? आणि परत हसायला लागली. तिच्या ह्या वाक्याने माझा एवढा मुड ऑफ झाला की मी काहीही बोललो नाही फक्त हा..ok.. अच्छा एवढेच चालू होतं. तिला हे जाणवलं पण तिनेही विषय वाढवला नाही.

पुढचे काही दिवस आम्ही बोललो पण आमच्यात एक अंतर निर्माण झालं होतं. हे अंतर माझ्याकडुन होतं. ती तिच्याकडून आधी सारखी बोलत होती. मी मात्र इंटरेस्ट दाखवत नव्हतो. कारण मला असे वाटतं होतं सायली ने मला अंधारात ठेवलं आहे. माझा हा वागण्यातला बदल तिला जाणवत होता पण ती अजून जास्त माझी मज्जा घेत होती. त्यांनतर मी कधीच तू कशी दिसतेस? काय करतेस असे प्रश्न विचारणे सोडून दिले

एक दिवस तिनेच मेसेज केला let’s Meet? आता माझा माझा ऑफ झालेला मुड थोडा रुळावर आला. काही का असेना आता ती नक्की कशी आहे हे तरी पाहायला मिळेल. ठरलेल्या दिवशी संध्याकाळी सात वाजता मी त्या कॅफेवर पोहोचलो. ती आली नव्हती. मी जाऊन एका टेबलवर बसलो. दिलेल्या वेळेनुसार अर्धा तास झाला तरी ती काही पोहोचलो नव्हती.

पुन्हा मुड ऑफ झालाच होता की मागून येऊन कुणीतरी माझी डोळे बंद केले. ओळख पाहू? तिचा तो आवाज आणि अलगद झालेला तिचा तो स्पर्श सर्व राग दूर करण्याचा काम करून गेला. मी सायली म्हणत मागे फिरलो आणि मला धक्काच बसला. एवढं मोठं खोटं ही मुलगी कशी बोलू शकते म्हणून मीच तिच्याकडे अवाक् पणे बघत राहिलो.

सायली तीच मुलगी होती जिचा प्रोफाइल फोटो होता. तिने माझ्या सोबत मस्ती करण्यासाठी खोटं सांगितले होतं. मला तिचा राग आला पण ह्या गोष्टीचा जास्त आनंद वाटला की ही तीच मुलगी आहे जी पहिल्या नजरेत मला आवडली होती. आणि आताही सायली फक्त माझ्यावर हसत होती.

ह्या पण माझ्या निवडक कथा वाचा.

समाप्त

कथेचा दुसरा भाग वाचायला आवडेल का? कमेंट मध्ये सांगा.

कथेचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत, लेखकाच्या नावासोबत कथा शेअर करायला हरकत नाही

लेखक : पाटीलजी (आवरे उरण)

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल