चारू जेवायला काय बनवले आहेस मला भूक लागली आहे जरा लवकर देतेस का? २ वर्षाचा तेजस बाजूला खेळत बसला होता आणि पाच वर्षाची विना पायरीवर बसून समोरच्या झाडाकडे पाहत होती, सध्या तिच्या मनात चालले असेल की या झाडावरचे पक्षी किती मोकळेपणाने एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडत आहेत पन आई आणि बाबा मला पहिल्यासारखे बाहेर खेळायला नाही पाठवत. मलाही यांच्यासारखे बागडायचे आहे. इतक्यात तिला भांडी पडल्याचा आवाज येतो.
म्हणून ती घरात जाते घरात तिच्या आईने मांडणीवरची टोप आणि डब्बे धडा धड आणून बाबांपुढे आपटले म्हणाली बघा यात काय आहे का? जितकं होत नव्हतं तितकं पुरवलं, दोन महिने तुमचा पगार नाही झाला, मला ही कळतंय हो तुमची परिस्थिती पण या पोरांना कशी कळणार? कोणाकडून पैसे मागायची ही सारखी लाज वाटते आहे, दोन तीन वेळा मागितले पण आता त्यांची ही परिस्थिती आपल्यासारखीच आहे. त्यामुळे त्यांच्याकडे हात पसरायचे कसे? खरं सांगू आपल्याला देवाने मध्यम वर्गीय का बनवले अगदीच गरीब बनवायला हवे होते? त्यामुळे कोणाकडे जेवण मागायची ही लाज वाटली नसती.
तुमचा पगार जेमतेम १५ हजार त्यात भाड्याची रूम, आपल्या बाईकचा दर महिन्याला अडीच हजार ईएमआय जातो, तुमच्या आई वडिलांना तीन हजार पाठवत घरच सामान, डॉक्टर, गाडीचा पेट्रोल, भाजी, मटण याच्यावर तुमचा सगळा पगार संपून जातो, तुमची तरी काय चुकी आहे म्हणा. तरीही रोजच्या खर्चातून दहा हजार सेवींग केली होती पण दोन महिन्यात ते ही संपले. एक काम करता का माझे कानातले घ्या आणि विका त्यातून मिळालेल्या पैशातून घरातील लागणार समान घेऊन या. आईचे हे बोलणे ऐकून बाबांच्या गळ्याशी आलेला अवंढा गिळत ते गपकन खुर्चीत बसले. जवळ जवळ दहा मिनिटे ते तसेच बसून होते.
म्हणाले विना तुला आठवतेय या कानातल्या साठी मी किती मेहनत घेतली होती, लग्नात तुला कानातले घातले नव्हते पण तरीही तुझी माझ्याकडून काहीच अपेक्षा नव्हती. पण एक दिवस शेजारी राहणाऱ्या काकूंच्या नवीन कानातल्यावर तुला मायेने हात फिरवताना पाहिले आणि त्याच दिवशी ठरवल होत तुला कानातले करायचे. त्याच्या दुसऱ्या दिवशी पासून मी ओव्हर टाईम करायला सुरुवात केली, तू बोलायची मला नका करू ओव्हर टाईम तुम्हाला त्रास होतोय ना ? पण मी त्याकडे अजिबात लक्ष दिले नाही आणि ओव्हरटाईम करून करून तुझ्यासाठी हे कानातले बनवले. माझी तब्बेत तेव्हा थोडी खालावली होती पण तुझ्या कानात हे कानातले पाहिले की माझा सगळा त्रास दूर व्हायचा.
बोलता बोलता बाबा आणि त्याच्यासोबत आईच्या ही डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या होत्या. वातावरण गढूळ झाले होते पण तरीही आईने दिलेले कानातले घेऊन बाबा गावातल्या सोनारकडे गेले आणि त्या पैशातून महिन्याचे सामान भरले. हे समान आता आम्हाला किती दिवा पुरेल माहीत नाही पण जितके दिवस पुरेल तितके दिवस धन्यता मानू बस. पण देवापुढे रोज हेच म्हणेन देव एक तर पुढल्या जन्मी श्रीमंत तरी बनव नाहीतर गरीब तरी जेणेकरून लोकांकडे मागताना लाज वाटायची नाही पण मध्यम वर्गीय अजिबात बनवू नकोस.
लेखक : पाटीलजी
(आवरे- उरण)
समाप्त
© या कथेचे सर्व हक्क लेखकास्वाधिन आहेत. लेखकाच्या नावासहित ही पोस्ट शेअर करायला हरकत नाही.