आज मी पहिल्यांदा गुलगुले केले. घरात बसून बसून नवरे मंडळींची काहीतरी खाण्याची इच्छा होते आणि त्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याची कसरत या काळात सगळ्या स्त्रियांची आहे. पण जरी वेगवेगळे खाण्याची इच्छा झाली तरी त्याप्रमाणे पदार्थ मिळतातच असे नाही. सध्या घरात जे पदार्थ असतील त्यातून नवीन काही बनवण्याची कला काही वेगळीच असते. आज आमच्या नवरे महाराजांचा आदेश आला काहीतरी गोड खायला कर ग..!
आता घरात तसे बघायला गेले तर गोडाचे करण्यासाठी तूप नव्हते किंवा अन्य लागणारे पदार्थ ही नव्हते. मग काय करू तर आठवण आली गुलगुले करू शकते. थोड्या पदार्थातून मस्त गोड असा पदार्थ तयार होतो नवऱ्याच्या समोर गुलगुल्यांची भरलेली थाळी आली की लगेच संपून जायची. मी फक्त ते करण्यासाठी ओट्या समोर उभी होते. पण ते करता करता मला एक लहानपणीची आठवण आली ती म्हणजे गुलगुळ्यांची. मी लहान होते तेव्हाची ही गोष्ट म्हणजे १२ -१३ वर्षाची असेन. तेव्हा खाण्याची इतकी काही विशिष्ठ आवड नव्हती जे मिळेल ते खाण्यात धन्यता मानत असे.
तेव्हा लहान होते आणि उड्या मारत मारत आमच्या दुकानात जायचे. पप्पांकडे पैसे मागण्यासाठी पप्पा लगेच पैसे द्यायचे. मग तशीच उड्या मारत मारत आमच्या नाक्यावर जायचे. तिथे मोठे पिंपळाचे झाड होते. त्या झाडाखाली एक आजोबा बसायचे. त्यांच्याकडे गुलगुले विकायला असायचे. मी एक रुपयाचे गुलगुले घेण्यासाठी तिथपर्यंत जायचे. त्या एक रुपयात ही भरपूर गुलगुले मिळायचे आणि म्हणून त्यांची चव अजूनही माझ्या जिभेवर आहे. महत्वाची गोष्ट काय आहे ती माहीत आहे त्या आजोबांना डोळ्यांनी दिसत नव्हते पण ते हाताने पैसे चाचपून ओळखायचे.
अशा लोकांच्यात ती एक कला असते. आता तुम्ही म्हणाल दिसत नाही तर ते गुलगुले कसे बनवायचे. त्यांची बायको होती ती हे बनवायची शिवाय त्यांच्याकडे शेंगदाणे, चने आणि भेल असे पदार्थ ही मिळायचे, पण गुलगुले ही त्यांची खासियत होती. गुलगुले घ्यायला गेले की ते हातावर थोडे चणे किंवा शेंगदाणे ठेवायचे. आता तसे कोणी देत नाही पण तेव्हाची माणसे आणि त्यांची माणुसकी काही वेगळीच होती.
आता त्या गोष्टीला खूप वर्षे झाली. ते आजी आजोबा कधीच हे जग सोडून ही गेले. पण गुळगुळ्यांची आठवण आली की त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.

गुलगुले बनवताना एक कप गव्हाचे पीठ घ्या. त्यात दोन चमचे तांदळाचे पीठ टाका. नसेल तरी चालेल पण तांदळाच्या पीठाने चांगले वरून कुरकुरीत होतात. थोड गूळ तुमच्या चवीनुसार किंवा साखर आणि फुगण्यासाठी थोडा खायचा सोडा टाका आणि भज्यासारखं पीठ मिसळा आणि तेलात सोडा मस्त लालसर होईपर्यंत तळा खायला खूप छान लागतात.