मित्रानो शेतामध्ये वालाच्या शेंगा डोलायला लागल्या की आपल्याला पोपटी बनवायच वेड लागतं. म्हणजेच एकदा डिसेंबर महिना चालू झाला की पोपटी बनवायला सुरुवात होते. जास्त करून रायगड भागात आगरी कोळी लोक मोठ्या आवडीने ही पोपटी बनवतात. ही पोपटी खायला ही इतकी चविष्ट लागते की आपल्याला ही पोपटी करायला वेळ निवडावी लागत नाही. तर ही पोपटी जशी मांसाहरी मध्ये असते तशी शाकाहारी देखील करतात. पण नॉन वेज पोपटीची चव आणि गोष्ट काही वेगळीच असते. एकदा खाल्ली की सतत खावीशी वाटणारी पोपटी यामध्ये वालाच्या शेंगा आणि भामरुडाची पाने या यातील महत्त्वाच्या वस्तू आहेत.
शिवाय ही पोपटी शिजवण्यासाठी ही मातीच्या मडक्याचा वापर केला जातो. तर यासाठी नेमक्या कोणत्या वस्तू लागतात तर पहिला भामरुडाची पाने,मडके, वालाच्या शेंगा, हळद, मीठ, लिंबू, मसाला यामध्ये मिक्स केलेले चिकन आणि अंडी. पहिल्या प्रथम मडक्यामधे भामरुडाची पाने खाली तळाला थोडी लावा. त्याच्यावर थोड्या वालाच्या शेंगा घाला शेंगावर अख्खा मीठ टाका. आता यावर एक चिकनचा थर द्या. त्यानंतर पुन्हा वालाच्या शेंगा टाका. त्या शेंगावार पुन्हा मीठ टाका आणि त्यावर परत चिकन टाका. नंतर पुन्हा शेंगा आणि शेवटी अंडी लावा. त्यानंतर पुन्हा शेंगा आणि वरून मीठ टाका आणि शेवटी मडक्याच्या तोंडाशी पुन्हा भामरुडाची पाने गचगचून मडका बंद करा आणि पेंढा आणि लाकडाच्या ढिगाराच्या आतमध्ये शिजायला ठेवा जवळ जवळ तीस मिनिटांत तुमची अस्सल गावरान पोपटी तयार होईल.
आता ही झाली गावा ठिकाणी करण्यात येणारी पोपटी पण जे लोक शहरात राहतात त्यांनी काय करायचे तर अशीच पोपटी शहरातल्या लोकांनी आपल्या जेवण बनवायच्या कूकर मध्ये करायची. ती कशी आपण थोडक्यात पाहू. ज्याप्रमाणे आपण पहिल्या प्रक्रियेत सामान घेतले तसेच येथेही घ्यायचा आहे फक्त भामरुडाचा पाला सोडून हे सर्व पदार्थ मोठ्या कूकरमध्ये पहिल्यांदा शेंगा नंतर चिकन पुन्हा शेंगा त्यावर चिकन असे तीन ते चार थर देत जा. अंडी ही त्यातच लावा आणि शेंगा टाकल्यावर वरून अख्खे मीठ पसरायला विसरू नका. शेवटी ओवा भुरभुरावा आता असे थर लावल्यावर हा कूकर जवळजवळ अर्धा तास मध्यम गॅस वर ठेवा आणि आठ ते नऊ शिट्या काढा. आता खायला तयार आहे तुमची कूकर मधली पोपटी.
या सगळ्यासाठी तुमच्या आवडीनुसार तुम्ही चिकन आणि शेंगा घेऊ शकता कमी जास्त प्रमाणात तुम्हाला आवडतील तशा. शिवाय वेज पोपटी ही अशाच प्रकारे करायची पण त्यात बटाटा, वांगे इत्यादी पदार्थ टाकून करावे.