लॉक डाऊन मुळे गावी बऱ्याच दिवस राहण्याचा योग आला. आधी गावी फक्त गणपती किंवा दिवाळीला येत होतो पण ते ही मोजकेच चार पाच दिवस पण आताची गोष्ट वेगळी होती. गावात आल्याने अनेक गावातील मित्र भेटले जे माझ्या वर्गात होते पण बरेच वर्ष त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होत नव्हते ते सुद्धा भेटत होते. अनेक वर्ष आम्ही शाळेत दंगा केला होता पण कॉलेज मध्ये मी शहरात प्रवेश घेतला आणि मामाच्या कडे राहू लागलो होतो. मग तिथेच जॉब मिळाला आणि स्थाईक झालो.
आज बऱ्याच वर्षांनी ती दिसली, ती म्हणजे माझी क्रश अपूर्वा. मी जेव्हा पाचवीला होतो तेव्हा तिने आमच्या वर्गात प्रवेश घेतला होता. तिला वडील नव्हते, आईच लोकांची धूनी भांडी करून लेकरांना शिकवत होती. पण अपूर्वा खूप हुशार मुलगी होती. अत्यंत कमी आणि मोजकेच ती बोलयची सर्वांना ती खडूस वाटायची पण मी जाणून होतो तिच्या परिस्थितीने आताच तिला खूप मोठं केलेय. शाळेतून घरी गेल्यावर आई सोबत ती सुद्धा कामे करायची. पाचवी ते नववी असा प्रवास मी तिच्यासोबत केला. ह्या चार वर्षात ती माझ्याशी बोलायची पण ते ही मोजकेच.
मला ती आवडत तर होती पण मी तिला विचारू शकत नव्हतो कारण मला माहित आहे तिचे उत्तर नाही असेच असणार होते. पण जेव्हा नववीतच असताना तिच्या आईने तिचे लग्न श्रीमंत माणसाशी जुळवून लाऊन ही दिलं. आम्हाला थांग पत्ता सुध्दा लागून दिला नाही. ती शाळेत का नाही येत ह्याचे उत्तर शोधता शोधता आम्हाला कळले की तिच्या आईने तिचे लग्न तिच्या वयापेक्षा तिप्पट वय असलेल्या माणसासोबत केलं. ऐकुन खूप वाईट तर वाटलं पण कदाचित हेच तिच्या नशिबात असेल असे समजून तेव्हा गप्प बसलो.
आज अपूर्वा मला गावात दिसली. तेव्हाची अपूर्वा आणि आताची अपूर्वा ह्यात खूप बदल झाला होता. आता ती मुलगी नव्हती तर स्त्री होती. कुणीही पाहूनच प्रेमात पडेल अशी ती दिसत होती. मी तिच्या समोर गेलो, आवाज द्यायची इच्छा तर होती पण ती ओळखेल का मला? म्हणून आवाज न देताच मागे फिरलो पण तिने मात्र मला हेरले, वो रोल नंबर १९ आहे का नाही ओळख? अग तुला अजूनही माझा नंबर पाठ आहे, आणि ओळख तर आहे ग पण मला वाटले तू मला ओळखणार नाही म्हणून मी आवाज दिला नाही.
अरे तुला कसे विसरेन बाबा, शाळेत तूच तर एक असा मुलगा होतास ज्याच्याशी धड मी बोलायचे. चल आता आलास आहेस तर घरी चहा घेऊन जा.अग नको आता चाललो घरी आईपण वाट बघत असेल. आता बरेच दिवस गावात आहे नक्की एक दिवस येतो. तिने पण हसुन माझा निरोप घेतला. तिला पाहून मला अजिबात वाटले नव्हते की हीच ती जुनी अपूर्वा होती. खूप बदल तिच्या वागण्यात बोलण्यात दिसत होता. घरी येऊन मी आईला तिच्याबद्दल विचारले.
अरे पोरा मागच्याच वर्षी तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाला. आपल्याच गावचा सरपंच होता तो, मग गावकऱ्यांनी आग्रह केला आणि हीलाच सरपंच पदासाठी उभी केली. आता आपल्या गावची सरपंच आहे ती, कारभार कसा एकदम नीटनेटका पार पाडते. कुणाला शंका काढायला विषयचं देत नाही. लाखात एक पोरगी आहे बघ ती. आईचे हे बोलणे ऐकून मन भरून आले. खरंच अपूर्वा कडे पाहून तिच्या वयापेक्षा जास्त जबाबदारी घेण्याची तिची सवय आजही गेली नाही हे मला कळलं. पण महत्त्वाचे हे होते की ती खुश होती. आणि कदाचित तिच्यात खुशीत मला आनंद झाला.
ही पण कथा वाचा.
ती मी आणि ती
समाप्त
लेखक : पाटीलजी
1 comment
[…] School Crush […]