मी आता पर्यंत अनेक गोष्टी पहिल्या. वाचल्या, उत्सुकता म्हणून त्याविषयी भरपूर अभ्यास केला. बऱ्याच दिवसापासून नव्हे तर बऱ्याच वर्षांपासून रस्त्यावर हळद कुंकू लावून टाकलेलं लिंबू ओलांडू नये असं लोकांकडून ऐकत आले आहे. घरच्यांनी मात्र याबद्दल कधी सांगितलं नाही. मात्र बाहेरच्या लोकांकडून अनेकदा हे ऐकले आहे. काहींना याचे फार गंभीर परिणाम भोगावे लागतात वगैरे वगैरे पण हे कितपत खरे आहे, याबद्दल मात्र जास्त कोणी खोलात शिरत नाही. चला तर मग आज या गोष्टी विषयावर सविस्तर जाणून घेऊया.
करणी, मूठ मारणे, वशीकरण, उतारा टाकणे अशा काही को-रीलाटेड संकल्पना आहेत. काही लोक स्वतःला या विषयाचे तज्ञ आहे असंही सांगतात. मुळात याची सुरुवात तिथून झाली..? पूर्वीच्या काळी जेव्हा माणूस नुकताच प्रगतीच्या वाटेवर होता. नैसर्गिक शक्ती असतात आणि कोणतीतरी अद्भुत शक्ती वैगरे असते जिच्या करवी या सगळ्या गोष्टी घडत असतात. झाड पाने, वृक्ष, वेळी, नद्या, नाले यांच्या रात्रीबेरात्री घडणाऱ्या काही अनाकलनीय गोष्टी नंतर गंभीर रूप धारण करत बाधित झाल्या.. त्यांनंतर तिथे भूत, हडळ, चेटकीण, खविस, वगैरे चे खानदान निर्माण झाले. ही झाली भुताची गोष्ट , आता वळूया करणी बाधाकडे. माझा या गोष्टींवर अजिबात देखील विश्वास नाही असं म्हणणार नाही, कारण अस काही आठवलं तर माझी देखील फाटते.
पण सांगायचा मुद्दा असा की या गोष्टी मला वैज्ञानिक दृष्ट्या पटत नाहीत. एकदा रस्त्यावर पडलेलं असंच काहीतरी नजरेस पडलं होतं. त्यात टाचणी टोचून ठरवलेलं लिम्बु,लाल मिरची आणि काळी बाहुली अस काहीसं ठेवलेलं होत. म्हणे ती ओलांडल्यामुळे माझ्या मैत्रीणीला कावीळ झाली होती. मला जेव्हा हे माझ्या दुसऱ्या मैत्रिणीने सांगितलं तेव्हा मी आपण शांतपणे ऐकून घेतलं, कारण ती काविळ झालेली मैत्रीण ते लिंबू ओलांडून पुढे गेली खरी मागे त्या काळ्या बाहुलीच्या सामानाची विल्हेवाट मीच लावली होती. बाहुली कचऱ्याच्या डब्यात टाकली, मिरच्या पायाने लाथडुन दिल्या, आणि दुपारच्या जेवणात पिळून खायला ते कुंकू लावलेलं लिंबू धुवून घेतलं.. छान लागलं जेवण, चारपाच दिवसांनीं जेव्हा हे कळलं तेव्हा मी स्वतःलाच शाबासकी दिली.
बघा ते फक्त ओलांडायचं नसत ना..? मी कुठं ओलांडलं..?? गमती गमतीत अस अनेकदा मी केलं आहे गावाकडे हे असे प्रकार बऱ्याचदा दिसतात. पण साध्य परिस्थिती बदलली आहे, लोक शिकून सज्ञान झाले आहेत. त्यामुळे हे काही नव्याने सांगायला नको. मात्र तरीही अजूनही बरीच लोकं आहेत जी हे सर्व मानतात. भारत हा पूर्वीपासूनच अंधश्रद्धाळू लोकांचा देश आहे. सतीप्रथा, जातीव्यवस्था, सामाजिक असमानता अशा कितीतरी अंधश्रद्धा इथे पूर्वी प्रचलीत होत्या आणि आजही आहेत. खरं सांगायचं तर याचे मूळ आपल्या मनात आहे. तुम्ही तर मानले की भूत आहे तर आहे करणी झाली आपले वाईट होणार, तर होणार, का माहितीय..?? निसर्ग आपल्या विचारांचे परिवर्तन आपल्या कृतीत करून द्यायला मदत करतो. त्यामुळे नेहमीच आनंदी आणि पॉसीटीव्ही राहा.
आपल्या बॉडी मधून दोन प्रकारचे वाईब्स निघत असतात. एक पॉसीटीव्ही आणि दुसरं निगेटिव्ह. आपण ज्या प्रकारचा विचार सतत करत जाऊ आपण तसल्याच परिस्थिती मध्ये अडकत जातो. एक गोष्ट मात्र विज्ञानाच्या पलीकडे आहे ते म्हणजे संपूर्ण सृष्टी ही पूर्णपणे निसर्ग नियमानुसार चालते. अनेक गोष्टी आजही आहेत ज्या आपल्या मनातून जन्म घेतात आणि त्याचे समूळ उच्चाटन देखील मानातूनच करावे लागते. मग कोणती गोष्ट घ्यायची आणि कोणती गोष्ट दुर्लक्षित करायची हे मात्र आपण ठरवायचं. लिंबू मिर्ची ओलांडल्यामुळे बाकी काही नाही मात्र मनात भीती तेवढी निर्माण होते. मग हीच भीती आपल्याला नेगटीव्ही कडे खेचून नेत असते.
यात अजून एक गोष्ट ती म्हणजे अध्यात्म. देव धर्म केल्याने या गोष्टी बाधत नाही असे म्हणतात. पण असे का असावे बरं..?? उत्तर अगदी साधे आहे. ज्या प्रकारे निगेटिव्ह एनर्जी आपले मन तयार करते. याच विरोधात लढणारी पॉसीटीव्ही एनर्जी देव धर्म केल्याने निर्माण होते. म्हणजे थोडक्यात दोन्ही गोष्टी या एकमेकांना जोडलेल्या आहेत. ज्या गोष्टी केल्याने आपली भीती कमी होते. मनाला आनंद मिळतो, शांती वाटते, आणि विशेष म्हणजे पॉसीटीव्हीटी तयार होते अशा गोष्टी आवर्जून कराव्यात. निसर्गनिर्मित नियम हे नेहमीच लागु होतात. त्यामुळे या गोष्टी नेहमीच लक्षात ठेवाव्यात.
बाकी एक गोष्ट पुन्हा एकदा सांगावीशी वाटते की तो टाचणी टोचेलला लिंबू तुम्ही खायला देखील घेतला तरी त्याची चव तीच लागते. ते लिंबू आपलं काम उत्तम प्रकारे करते. त्यामुळे त्याचे गुणधर्म बदलतात वगैरे सर्व थोतांड आहे..आणि कधी लिंबू कापले आणि ते लाल निघाले तर समजून जा कोणी तरी त्याला निरमाचं इंजेक्शन दिल आहे. असा खोडसाळपणा करणारे अनेक लोकं आहेत. त्यामुळे काय घ्यायचं आणि काय ठेवायचं हे तुम्हीच ठरवा…!! बाकी नवीन वर्ष पुन्हा आहेच नवीन टाचण्या टोचलेल्या लिंबांनी भरलेलं..!!